देशभरात 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राबवण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) अभियानाची यशस्वी सांगता झाली. निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्याच्या उद्देशाने देशभरात हे डीएलसी अभियान 2.0 राबवण्यात आले. देशातील 100 शहरांमधील 597 ठिकाणी 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत या डीएलसी अभियान 2.0 ची अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे 38.47 लाख निवृत्तीवेतन धारक, राज्य सरकारांचे 16.15 लाख निवृत्तीवेतन धारक तसेच ईपीएफओचे 50.91 लाख निवृत्तीवेतन धारक यांच्यासह 1.15 लाख डीएलसीज जारी करण्यात आली.
केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने निवृत्तीवेतन वितरक बँका, मंत्रालये/विभाग, पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 100 शहरांमधील 500 ठिकाणी राष्ट्रव्यापी डीएलसी मोहीम राबवली. केंद्र सरकारी मंत्रालये तसेच विभाग, निवृत्तीवेतन वितरक बँका, तसेच निवृत्तीवेतनधारक संघटनांसह सर्व भागधारकांच्या भूमिका तसेच जबाबदाऱ्या निश्चित करणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. निवृत्तीवेतन वितरक बँकांमधील 297 नोडल अधिकारी तसेच 44 पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन्स यांच्याकडे डीएलसी 2.0 अभियानाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. प्रतीक्षा कालावधी कमी करून डीएलसी जारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
देशभरात व्यापक प्रमाणात राबवलेले अभियान
• देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या निवृत्तीवेतन धारकांना डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुविधेचा लाभ होणे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने निवडण्यात आलेल्या 100 शहरांमध्ये राज्यांच्या राजधानीची शहरे तसेच इतर प्रमुख शहरे यांचा समावेश होता.
• यामध्ये दिल्ली, विशाखापट्टणम, गुवाहाटी, पटना, रायपुर, गोवा, अहमदाबाद, शिमला, रांची, बेंगळूरु, थिरूवनंतपुरम, भोपाळ,मुंबई, भुवनेश्वर, लुधियाना, अजमेर, गँगटोक, चेन्नई, हैदराबाद,त्रिपुरा, लखनौ आणि डेहराडून या शहरांचा समावेश होता.
• निवृत्तीवेतन धारकांना तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने, त्यांच्या डीएलसीज जारी करण्यासोबतच भविष्यात त्यांना या पद्धतीचा सुरळीतपणे वापर करता यावा यासाठी ही प्रक्रिया त्यांना समजावून देखील देण्यात आली.


