महाराष्ट्र राज्य सरकारकडून मागील काही वर्षांपासून कान येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठवले जातात. मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा हा यामागचा उद्देश आहे. 2023 या वर्षी मे महिन्यात होणाऱ्या या महोत्सवात चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित ‘या गोष्टीला वाव नाही’, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित ‘टेरिटेरी‘, आणि मंगेश बदर दिग्दर्शित ‘मदार’ या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने चित्रपट निवडीसाठी परीक्षण समिती तयार केली होती. या समितीत अशोक राणे, मनोज कदम, डॉक्टर संतोष पाठारे, सचिन परब, उन्मेष अमृते, मंगेश मर्ढेकर, मनीषा कोरडे, अनिकेत खंडागळे यांचा समावेश होता. यासाठी एकूण 34 मराठी चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले. निवडलेल्या तीन चित्रपटात काही तांत्रिक समस्या आल्यास टाईमप्लस प्रोडक्शनचा ‘गाव’ आणि परफेक्ट ग्रुप निर्मित ‘गिरकी’ हे चित्रपट पाठवण्यात येतील.
कान चित्रपट उत्सव:
कान चित्रपट महोत्सवाची सुरवात 1946 या वर्षी झाली. हा उत्सव फ्रांस येथील कान नावाच्या शहरात भरतो. हा जगातला एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. येथे चित्रपट दाखवला जाणे हे सन्माननीय आहे. तसेच येथे मिळणारा कान उत्सव पुरस्कार हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.