- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत, गुजरातमधील आणंद येथे 22 जुलै रोजी दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील शाश्वत विकास या W20 जनभागीदारीविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- दुग्धविकास क्षेत्रातील तज्ञ आणि महिला नेतृत्वासह सन्माननीय अतिथी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
- केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री परशोत्तम रुपाला यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.
- दुग्धविकास क्षेत्रात महिलांचे महत्त्व आणि त्यांची भूमिका यावर अधिक भर देत त्यांनी मूल्यवर्धित दुग्ध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये महिलांच्या योगदानाकडे निर्देश केला तसेच सध्या कार्यरत असलेल्या दूध सहकारी संस्थांपैकी 18 संस्था संपूर्णपणे महिलांद्वारा संचालित आहेत, या बाबीचा त्यांनी ठळक उल्लेख केला.
- पशुपालन विभाग सचिव अलका उपाध्याय यांनी यावेळी, श्वेतक्रांतीमध्ये महिलांच्या लक्षणीय योगदानावर भर देऊन सांगितले की सध्या दुग्धविकास क्षेत्रामधील एकूण कार्यबळात 70 टक्के महिलांचा समावेश आहे.
- त्यांनी ए-हेल्प (पशुधनाचे आरोग्य तसेच विस्तार यासाठी नेमलेले मान्यताप्राप्त एजंट) या नव्या उपक्रमाचा देखील उल्लेख केला.
- या उपक्रमामध्ये समुदायाधारित महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने प्राथमिक सेवा पुरवतानाच, स्थानिक पशुवैद्यकीय सेवा प्रदाते आणि पशुधनाचे मालक यांच्यातील दरी साधण्याचा प्रयत्न करण्यात येतो.


