माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह तसेच प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांना ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर करण्यात आला होता.
अधिक माहिती
● नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर 2014 पासून आतापर्यंत 10 जणांना ‘भारतरत्न’ सन्मान देण्यात आला आहे.
● आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक पाच ‘जणांना ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर केला आहे. यापूर्वी 199 मध्ये जयप्रकाश नारायण, अमर्त्य सेन, गोपीनाथ बोर्डोलोई आणि सतारवादक पंडित रविशंकर अशा चौघांना एकाच वर्षी ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर केला होता.
● तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होते. तर चरण सिंह यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर 1979 मध्ये सरकार बनविले होते.
● कृषी क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या स्वामिनाथन यांच्या कार्याची दखल घेत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर केला आहे.
● देशातील ‘हरित क्रांतीचे जनक ‘ अशी स्वामिनाथन यांची ओळख आहे.
● आजतागायत एकूण 53 व्यक्तींना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पी. व्ही. नरसिंह राव
● जन्म: 28 जून, 1921,वांगारा , करीमनगर, आंध्र प्रदेश, भारत
● पूर्ण नाव: पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव
● नरसिंह राव यांचे शिक्षण उस्मानिया, मुंबई आणि नागपूर विद्यापीठात झाले, तेथून त्यांनी बीएस्सी आणि एलएलबी पदव्या संपादन केल्या.
● पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातही त्यांनी शिक्षण घेतले.
● 1938 मध्ये तत्कालीन निजाम सरकारने ‘वंदे मातरम’वर घातलेलया बंदीविरोधी आंदोलानातून त्यांनी राजकारणात पदार्पण केले.
● भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
● 1957 मध्ये त्यांची आंध्र प्रदेशातील मंथानी विधानसभा क्षेत्रातून निवड झाली.
● याच मतदारसंघातून सलग 20 वर्षे ते निवडून गेले.
● या काळात त्यांनी विविध मंत्रिपदे सांभाळली.
● 1969 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला.
● यामुळे 1971 मध्ये त्यांची आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.
● या काळात त्यांनी भूमी सुधारचे कायदे संमत केले.
● या कायद्यांनी त्यांची लोकप्रियता वाढली. 1973 पर्यंत त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले.
● 1977 मध्ये पहिल्यांदा हनमकोंडा लोकसभा मतदारसंघातुन निवड झाली.त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.
● 1984 व 1989 या दोन लोकसभा त्यांनी रामटेकमधून लढविल्या.
● इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात ते संरक्षण मंत्री होते.
● 1984 मध्ये राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री, मानव संसाधन मंत्री अशी महत्त्वपूर्ण खाती सांभाळून प्रभावी मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.परंतु 1991 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नाही.
● राजीव गांधी यांची 1991 मध्ये हत्या झाल्यानंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे देशाची सूत्रे आली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे स्वीकारली.
● यानंतर त्यांनी 1991 मध्ये आंध्र प्रदेशातील नंद्याळ या मतदारसंघातून लोकसभा लढविली. निवडणूक रसातळाला गेलेली भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी उदारीकरणाचे धोरण राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला.
● डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदावर नियुक्ती करून त्यांनी उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरणे राबवून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले.
● यामुळे त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.
● 1991 मध्ये त्यांचे सरकार हे अल्पमतातील असताना सुद्धा राजकीय चातुर्याने त्यांनी पाच वर्षे पूर्ण केली. यामुळे त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जात होते.
● तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिटन यांच्याशी वॉशिंग्टन येथे झालेल्या शिखर बैठकीनंतर राव यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध वेगाने वृद्धिंगत झाले.
● जानेवारी 1980 मध्ये नवी दिल्लीत पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या तिसऱ्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
● तसेच मार्च 1980 मध्ये द न्यूयॉर्क येथे झालेल्या जी-77 बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
● भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती, काल्पनिक आणि राजकीय लेखन, विविध भाषा शिकणे, तेलगु आणि हिंदी भाषेत कविता करणे आणि एकूणच साहित्याबाबत त्यांना विशेष रुची होती.
● त्यांनी ‘द इनसाइडर’ हे 700 पानांचे अर्ध-आत्मचरित्र लिहिले, जे त्यांचे कट्टर-राजकीय प्रतिस्पर्धी पण जवळचे मित्र आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रकाशित केले.
● नरसिंह राव हे पंतप्रधान असताना नव्वदच्या दशकात आर्थिक सुधारणा कार्यक्रमास सुरुवात झाली होती.
● 1991 ते 1996 या काळात ते पंतप्रधान होते.
● देशाचे नववे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला.
● ते देशाचे दक्षिण भारताचे पहिले पंतप्रधान ठरले.
● राव यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती, तेव्हा परकी चलनाचा मोठा तुटवडा झाला होता. अशा वेळी जागतिकीकरण, मुक्त आर्थिक धोरण आणि खासगीकरणाचा अंगीकार करत राव सरकारने आर्थिक सुधारणांना सुरुवात केली.
● नरसिंह राव यांचे डिसेंबर 2004 मध्ये निधन झाले.
चौधरी चरणसिंह
● जन्म: 23 डिसेंबर,1902, नूरपूर, जि. हापुर, उत्तर प्रदेश
● शेतकऱ्यांचे तारणहार अशी ओळख असलेल्या चौधरी की चरणसिंह यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ होती.
● त्यांनी भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून एकदा पंतप्रधानपद आणि दोनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवले.
● अत्यंत साधेपणाने जीवन व्यतित केलेल्या चरणसिंह यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक पदे भूषवली.
● जनतेत सहजपणे मिसळून काम करून लोकप्रियता मिळवणाऱ्या मोजक्या राजकीय नेत्यांत त्यांचा समावेश होतो.
● जनसेवेस समर्पित कार्यकर्ता आणि सामाजिक न्यायावर दृढविश्वास असलेल्या चरणसिंह त्यांच्या कारकीर्दीत लाखो शेतकऱ्यांचे एकमुखी नेतृत्व झाले.
● स्वातंत्र्योत्तर भारतात चरणसिंह यांनी 28 जुलै 1979 ते ऑगस्ट 1979 पर्यंत पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली.
● 21 ऑगस्ट 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान होते.
● 3 एप्रिल 1967 ते 25 फेब्रुवारी 1968 आणि 18 फेब्रुवारी 1970 ते 1 ऑक्टोबर 1970 पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
● 1923 मध्ये विज्ञान विषयात पदवी आणि 1925 मध्ये आग्रा विद्यापिठातुन पदव्युत्तर पदवी मिळवली.
● 1929 मध्ये ते मेरठ येथे आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महात्मा गांधींजींच्या ब्रिटिशविरोधी अहिंसक सत्याग्रहात भाग घेणारे ते स्वातंत्र्यसैनिक होते.
● या काळात त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगला. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहाबद्दल ब्रिटिशांनी त्यांना 12 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.
● वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनासाठी नोव्हेंबर 1940 मध्ये त्यांना पुन्हा एक वर्षासाठी तुरुंगवास भोगावा लागला.
● ऑगस्ट 1942 मध्ये त्यांना ब्रिटिशांनी पुन्हा तुरुंगात टाकले आणि नोव्हेंबर 1943 मध्ये त्यांची सुटका झाली.
● ते तत्कालीन संयुक्त प्रांताच्या विधानसभेसाठी सर्वप्रथम 1937 मध्ये छपरौली येथून निवडले गेले आणि 1946, 1952, 1962 व 1967 मध्ये विधानसभेत ते या मतदारसंघातून निवडून गेले होते.
● 1946 मध्ये ते पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या सरकारमध्ये संसदीय सचिव बनले.
● त्यानंतर महसूल, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य न्याय, माहिती इत्यादी विविध विभागात त्यांनी काम केले.
● जून 1951 मध्ये त्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करून, न्याय व माहिती विभागाचा कार्यभार देण्यात आला.
● नंतर 1952 मध्ये ते डॉ. संपूर्णानंद यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल व कृषी मंत्री बनले.
● चरणसिंह सी. बी. गुप्ता यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृह व कृषी मंत्री (1960) होते.
● सुचेता कृपलानी यांच्या मंत्रिमंडळात चरण सिंह कृषी व वन मंत्री (1962-63) होते.
● 1965 मध्ये त्यांनी कृषी विभाग सोडून दिला आणि 1966 पासून स्थानिक स्वयंप्रशासन विभागाची जबाबदारी घेतली.
● काँग्रेसच्या विभाजनानंतर फेब्रुवारी 1970 मध्ये ते काँग्रेसच्या पाठिंब्याने दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
● परंतु पुढे 2 ऑक्टोबर 1970 पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
● उत्तर प्रदेशातील जमीन सुधारणा कार्याचे संपूर्ण श्रेय श्री. चरण सिंह यांना जाते.
● ग्रामीण कर्जदारांना दिलासादायक ठरलेले 1939 मधील विभागीय कर्जमुक्ती विधेयक, तयार करण्यात आणि अंतिम रूप देण्यामध्ये चरण सिंह यांची महत्वपूर्ण भूमिका होती.
● त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उत्तर प्रदेशातील मंत्र्यांचे वेतन व त्यांना या मिळणाऱ्या अन्य लाभांचे प्रमाण बरेच कमी करण्यात आले.
● मुख्यमंत्री म्हणून जमीन धारणा व कायदा (1960) बनविण्यातही या महत्त्वपूर्ण भूमिका होती.
● त्यांनी अनेक पुस्तके व प्रचार-पुस्तिका लिहिल्या ज्यामध्ये ‘जमीनदारी निर्मूलन’, ‘भारतातील गरीबी व त्यावरील उपाय’, ‘शेतकऱ्यांची भूसंपत्ती की शेतकऱ्यांसाठी जमीन’, ‘प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिग्स बिलो ए सर्टन मिनिमम’, ‘को-ऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स-रेड’ ही काही त्यांची काही प्रमुख ग्रंथसंपदा आहे.
एम. एस.स्वामिनाथन
● जन्म : कुंभकोणम, 7 ऑगस्ट, 1925
● ते भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
● त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी ‘एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केला.
● मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म तमिळमाडूमध्ये कुंभकोणम येथे 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला.
● त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण 1943 मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले.
● केरळ्मधील महाराजस कॉलेजातून त्यांनी कृषिक्षेत्रातली पदवी घेतली.
● स्वामीनाथन यांचा विवाह मीना स्वामीनाथन यांच्याशी झाला होता. हे दोघे केंब्रिजमध्ये शिकत असताना 1951 मध्ये त्यांची भेट झाली होती. ते चेन्नई, तामिळनाडू येथे राहत होते.
● कृषिक्षेत्रात काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली.
● 1947 साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले.
● 1949 मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्त केली.
● युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले.
● नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी 1952 मध्ये पीएच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले.
● भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.
स्वामिनाथन यांना मिळालेले पुरस्कार
● 1967 मध्ये पद्मश्री, 1972 या वर्षी पद्मभूषण आणि साल 1989 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.
● शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी जगभरात सन्मान मिळाला होता.
● रॅमन मॅगसेसे पुरस्कार (1971), वर्ल्ड फूड प्राईझ (1987) नेही त्यांना सन्मानीत करण्यात आले होते.
● 2007 – राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वामिनाथन यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले.
● 1979 – त्यांची भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली.
● 1965 – चेकोस्लोव्हाक अकादमी ऑफ सायन्सेसकडून मेंडेल मेमोरियल मेडल मिळाले.
● 1999 – युनेस्को गांधी सुवर्ण पदक
● 1999 – शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार
● 2000 – फ्रँकलिन डी. रुझवेल्ट फोर फ्रीडम्स अवॉर्ड
● टाइम मॅगझिनने त्यांना 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांपैकी एक म्हणून गौरवले.
● 1986 – अल्बर्ट आइनस्टाइन जागतिक विज्ञान पुरस्कार
● 1991- पर्यावरणीय कामगिरीसाठी टायलर पुरस्कार
● 1961 – शांती स्वरूप भटनागर पुरस्कार