कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने संपूर्ण देशभरात सुधारित ‘निधी आपके निकट’ 2.0 हा व्यापक स्तरावरील जनसंपर्क कार्यक्रम जानेवारी 2023 मध्ये घोषित केला आणि त्याची अंमलबजावणी केली आणि 29 जानेवारी 2024 रोजी या कार्यक्रमाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
अधिक माहिती
● दर महिन्याला एकाच दिवशी देशातील सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
● हा कार्यक्रम दर महिन्याच्या 27 तारखेला आयोजित केला जातो.
● कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य किंवा कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे तिथल्या तिथे निवारण करण्यासाठी सक्रिय सहभागाद्वारे जनजागृती तसेच विविध भागधारांसमवेत माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी सर्वसमावेशक, एकसंध आणि सुसंगतपणे संपर्क साधता यावा, असा या अभियानाचा उद्देश आहे.
● ‘निधी आपके निकट’ हा कार्यक्रम बरोबर एक वर्षांपूर्वी सुरु झाला आणि या वर्षभरात संपूर्ण देशभरात अनेक संवाद आणि अनेक समस्यांवरील उपायांसह या कार्यक्रमाने असंख्य यशोगाथा पाहिल्या आहेत.
● दर महिन्याला ‘निधी आपके निकट’ या कार्यक्रमाची एक संकल्पना ठरलेली असते आणि एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अर्थात ‘कर्मचारी ठेव विमा योजनेचे फायदे’ अशी या महिन्याची म्हणजेच जानेवारी 2024 ची संकल्पना आहे.
● यापूर्वी विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात भविष्य निधी अदालत आयोजित करण्यात येत असे तर ‘निधी आपके निकट’ एकाच दिवशी देशातील प्रत्येक जिल्ह्यात संबंधितांपर्यंत पोहोचत आहे.
● मुंबईत चर्चगेट येथील RPFC-I नरिमन पॉइंट IMC येथे झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यात रंजन कुमार साहू, यांनी सर्व भागधारकांच्या मेळाव्याला संबोधित केले.
● साहू यांनी आपल्या भाषणात या कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी तिथल्या तिथे तक्रारींचे निवारण करण्यावर भर दिला.
● आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे महासंचालक अजित मंगरूळकर, यांनी देखील कार्यक्रमाला संबोधित केले आणि ईपीएफओच्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले आणि भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
● या उपक्रमाद्वारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्यामुळे या कार्यक्रमाला सदस्य, निवृत्तीवेतनधारक, नियोक्ते, एक्झम्प्टेड ट्रस्ट, उद्योग संघटना, चेंबर्स, कर्मचारी संघटना, केंद्रीय विश्वस्त मंडळ, प्रादेशिक समिती सदस्य इत्यादींनी मोठ्या संख्येने नियमितपणे उपस्थित राहतात आणि या उपक्रमाची प्रशंसा करतात.
● कर्मचारी राज्य विमा महामंडळ देखील त्यांच्या ‘सुविधा समागम’ कार्यक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी झाले होते.