भावसंगीताशी जवळीक साधू पाहणाऱ्या अदाकारीने ऐंशी- नव्वदच्या दशकांतील तरुण पिढीच्या मनात गझलविषयी प्रेम निर्माण करणारे प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.
अल्पपरीचय
● पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूरमध्ये झाला.
● केशुभाई उधास आणि जितुबेन उधास हे त्यांच्या आई- वडिलांचे नाव.
● त्यांचे मोठे भाऊ मनहर उधास यांनी बॉलिवूडमध्ये हिंदी पाश्र्वगायक म्हणून यश मिळवले. त्यांचे दुसरे मोठे भाऊ निर्मल उधास हे गजलगायक आहेत.
● पंकज उधास यांनी सर बीपीटीआय भावनगरमध्ये शिक्षण घेतले होते.
● पंकज उधास लहान असताना त्याचे वडील दिलरुबा हे तंतुवाद्य वाजवत असत. उधास भावंडांची संगीतातील आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना राजकोट येथील संगीत अकादमीमध्ये दाखल केले. त्यांनी सुरुवातीला तबला शिकण्यासाठी स्वत:ची नोंदणी केली; पण नंतर गुलाम कादीर खान साहेब यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली.
● त्यानंतर उधास ग्वाल्हेर घराण्याचे गायक नवरंग नागपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले.
● चार वर्षांनंतर ते राजकोटच्या संगीत नाट्य अकादमीत दाखल झाले आणि त्यांनी तबला वाजविण्याचे बारकावे शिकले. त्यानंतर, त्यांनी विल्सन कॉलेज आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेज येथे विज्ञान शाखेची पदवी घेतली आणि मा. नवरंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण सुरू केले.
● त्यांचे पहिले गाणे उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेले आणि नक्ष लायलपुरी यांनी लिहिलेले ‘कामना’ चित्रपटातील एकल गाणे होते.
● त्यांनतर त्यांना गजलची आवड निर्माण झाली आणि गजलगायक म्हणून करिअर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते उर्दू शिकले.
● पहिला गजल अल्बम ‘आहट’ 1980 मध्ये प्रसिद्ध झाला.
● ‘जिए तो जिए कैसे’ या गाण्यासह ‘फिर तेरी कहानी याद आयी’ आणि ‘यह दिल्लगी’ चित्रपटातही त्यांच्यावर गाणे चित्रित झाले.
● चित्रपटातून गाणी गाताना दिसणारे पंकज उधास ही एकप्रकारे त्यांची वेगळी ओळख ठरली.
● ‘एक ही मक्सद’ चित्रपटातील ‘चांदी जैसा रंग है’, ‘मोहरा’ चित्रपटातील ‘ना कजरे की धार’ या गाण्यांबरोबरच त्यांच्याच अल्बममधील ‘चुपके चुपके’,’अहिस्ता’ या अल्बममधील ‘और अहिस्ता किजे बातें…’ अशी त्यांची कित्येक गाणी आजही लोकप्रिय आहेत.
● त्यांच्या गझल गायकीतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते.