- 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि हरित वसई चळवळीचे प्रणेते सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.
- साहित्य, पर्यावरण आणि समाजकारण या क्षेत्रांत कार्यरत राहून भरीव योगदान देणारे धर्मगुरू, अशी त्यांची ओळख होती.
अल्पपरीचय:
- विरार पश्चिमेकडील नंदाखाल गावात 4 डिसेंबर 1942 रोजी जन्मलेल्या फ्रान्सिस दिब्रेटो यांचे प्राथमिक शिक्षण गावातील सेंट जोसेफ मराठी हायस्कूल मध्ये झाले.
- फादर दिब्रिटो हे वयाच्या 29 व्या वर्षी धर्मगुरु झाले.
- त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले.
- त्यानंतरच्या काळात त्यांनी विपुल लिखाण केले.
- ‘आनंदाचे अंतरंग’, ‘ओअॅसिसच्या शोधात’, ‘ख्रिस्ताची गोष्ट’, ‘ख्रिस्ती सण आणि उत्सव’, , ‘तेजाची पावले’, ‘नाही मी एकला’, ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्त्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास, सुबोध बायबल, सृजनाचा मळा, मुलांचे बायबल, सृजनाचा मोहोर, इत्यादी समग्र लिखाण त्यांनी केले.
- धार्मिक अभ्यास करतानाच त्यांनी साहित्य उपासनाही सुरू ठेवली.
- वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे दीर्घकाळ संपादक होते.
- त्यांच्या विचारांवर आणि लेखनावर बायबलसह ज्ञानोबा-तुकोबांच्या संतसाहित्याचाही मोठा प्रभाव होता.
- साहित्याच्या विविध प्रकारांत लेखन करणाऱ्या दिब्रिटो यांनी बायबलचा मराठी अनुवाद केला. त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
- 2020 मध्ये उस्मानाबाद(आताचे धाराशिव) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक – कार्यासाठी त्यांना राज्यस्तरावरील 22हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
- वसईतील हरितपट्टा वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठीच्या पर्यावरण चळवळीचे ते प्रणेते होते.
- त्याचबरोबर या पट्ट्यात फोफावत चाललेल्या भूमाफिया आणि गुंडगिरीविरोधातही त्यांनी सामान्यजनांची एकजूट करून यशस्वी लढा दिला.