स्वच्छतागृहाची संकल्पना रुजवून सामाजिक भान जपणारे सुलभ इंटरनॅशनल चे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात रामपूर बघेल या गावात एका ब्राह्मण कुटुंबात पाठक यांचा जन्म झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली 1968 साली’ बिहार गांधी जन्मशताब्दी समिती’मध्ये काम करत असताना त्यांना हाताने मैला उचलणाऱ्यांच्या समस्यांची जाणीव झाली. या विषयावर पीएचडी करीत असताना त्यांनी देशभर प्रवास केला आणि सफाई कामगारांचे आयुष्य जवळून पाहिले. त्याच्या दोन एक वर्षानंतर(1970) पाठक यांनी ‘सुलभ इंटरनॅशनल’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. उघड्यावर मलमूत्र विसर्जनामुळे पसरणारी रोगराई कमी व्हावी, सार्वजनिक स्वच्छतागृहांपेक्षा अधिक चांगला पर्यावरण पूरक आणि स्वस्तातील पर्याय सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध व्हावा या उद्देशाने अनेक शहरे आणि गावांमध्ये सुलभ शौचालय उभारली. त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनामुळे तळागाळातील लोकांना रोजगार मिळवून दिला. भारतीय काँग्रेसकडून भागलपूर येथून ते खासदार होते. भारतीय स्वछ रेल्वेचे सदिच्छा दूत होते.
पाठक यांना मिळालेले पुरस्कार:-
- 1991 – पद्मभूषण
- 2017 – लाल बहादूर शास्त्री पुरस्कार
भारताचे टॉयलेट मॅन:-
स्वच्छ भारत अभियान हा शब्द अलीकडेच प्रचलित झाला असला तरीही पाठक यांनी 1970 सालीच याचा ध्यास घेतला असल्यामुळे भारताचा टॉयलेट मॅन अशी त्यांची ओळख झाली. सुलभ उपक्रमाची सुरुवात केली तेव्हा त्यांना टिकेचे धनी व्हावे लागले होते.


