अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये:
- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सन 2024-25 चा तब्बल 20 हजार 51 कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प 28 जून 2024 रोजी सादर केला.
- 14 व्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आणि तीन महिन्यांत होऊ घातलेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिला, शेतकरी; तसेच विद्यार्थी व तरुणांच्या खात्यात थेट निधी देणाऱ्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली.
- विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थमंत्री या नात्याने वैयक्तिक दहावा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी भाषणाची सुरुवात आणि शेवट संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळींनी केली.
- आषाढी वारीनिमित्त तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवत असतानाच, विधिमंडळातील भाषणात अजितदादांनी ‘तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा, पार नाही’ असे बोलून दाखवले.
महत्वाच्या योजना
- ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’:
- मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जुलै महिन्यापासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली.
- या योजनेत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये भत्ता दिला जाईल.
- मात्र, कुटुंबप्रमुखाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील अशी घोषणा करण्यात आली.
2) कृषीपंपांना मोफत वीज
- शेतकऱ्यांच्या5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवठा करण्याची घोषणा करण्यात केली.
- ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’त 44 लाख शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा भार शासनाकडून उचलला जाणार आहे.
- या योजनेकरिता 14 हजार 761 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
3) तीन सिलिंडर मोफत
- केंद्र सरकारच्या सवलतींचा लाभ मिळालेल्या राज्यातील पात्र कुटुंबाना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ जाहीर करण्यात आली आहे.
- सुमारे 52 लाख कुटुंबियांना या योजनेचा लाभ होईल.
4) मुलींना मोफत उच्च शिक्षण
- राज्यातील मुलींना पदवी आणि पदविका अभ्यासक्रमापर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असलेल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळेल.
5) दहा हजार रुपये विद्यावेतन
- ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ अंतर्गत दरवर्षी 10 लाख तरुण-तरुणींना पदवी, पदविकेनंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण म्हणून दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देण्याची नवीन घोषणा करण्यात आली.
महिलांसाठी विविध योजना:
- महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना जाहीर करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 17 शहरांतील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 80 कोटींचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
- महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’ घोषित करण्यात आली आहे.
- बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रखमेत 15 हजारावरून 30 हजार रुपये अशी दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
- शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेतील लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजारावरून 25 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा करण्यात आली.
महात्मा फुले जन आरोग्य योजना:
- राज्यातील केवळ गरीब, गरजू नागरिकांसाठी जुलै 2012 पासून लागू करण्यात आलेली महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व कुटुंबांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- यापूर्वी या योजनेचा लाभ अंत्योदय, पिवळे किंवा केशरी कार्डधारकांना मिळत होता.
आरोग्य योजना
- रुग्णांच्या आरोग्य विमा सरंक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब 1 लाख 50 हजार रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
- राज्यातील 1 हजार 900 रुग्णालयांमार्फत 1 हजार 356 प्रकारचे छोटे मोठे उपचार या विमा
- संरक्षणाअंतर्गत केले जाऊ शकणार आहेत.