अक्साई चीनमध्ये टेहळणी करणारे, 1971 च्या युद्धात पूर्व पाकिस्तानात (बांगलादेश) अकस्मात हल्ला चढवत पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडणारे युद्धनायक मेजर जनरल राजेंदर नाथ (निवृत्त) यांचे चंडीगढ येथे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. सैन्य दलात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांचे नेतृत्व कौशल्य ठळकपणे अधोरेखित झाले होते. 1946 मध्ये ते भारतीय लष्करी प्रबोधिनीत दाखल झाले.
अधिक माहिती
● देशाला स्वातंत्र्य मिळत असताना 11 गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली.
● लष्करी गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना अक्साई चीन परिसरात टेहळणी करणारे ते पहिले अधिकारी बनले.
● 1971 च्या युद्धात नाथ यांनी 62 माऊंटन ब्रिगेडचे नेतृत्व केले.
● शत्रूला सुगावा लागू नये म्हणून सैन्याची हालचाल, तैनाती बेमालूमपणे करण्यात आली. त्यांच्या ब्रिगेडने पूर्व पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणे काबीज केली.
● मधुमती नदी काठावरील लढाई सर्वाधिक रोमहर्षक ठरली.
● कुमारखली शहर काबीज करण्यासाठी रात्रीतून चपळाईने हालचाली करण्यात आल्या. चिलखती रेजिमेंटचे रशियन बनावटीचे पोटी – 76 रणगाडे नदीपात्रातून पलीकडे नेण्यात आले. ब्रिगेडने असा हल्ला केला की, कमांडर मेजर जनरल अन्सारी यांच्यासह पाकिस्तानच्या नऊ डिव्हिजनला आत्मसमर्पण करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. या मोहिमेची यशस्वीता लक्षात घेऊन 62 माउंटन ब्रिगेड हा दिवस ‘मधुमती दिवस’ म्हणून साजरा करते.
● निवृत्तीनंतर चंदीगड स्थित सोसायटी फॉर द केअर ऑफ द ब्लाइंड संस्थेच्या कार्यात त्यांनी स्वतःला गुंतवले.
● या संस्थेचे अध्यक्षपदाची धुरा नाथ यांनी प्रदीर्घकाळ सांभाळली.
● सामाजिक सेवेतील योगदानाबद्दल चंदिगड प्रशासनाने त्यांच्या गौरवी केला.
● चंदिगड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले होते.