दिगंबर जैन मुनी परंपरेचे आचार्य श्री विद्यासागर महाराज (वय ७८) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यात सल्लेखना व्रतानंतर निधन झाले. विद्यासागर महाराजांच्या निधनामुळे छत्तीसगड सरकारने रविवारी(18 फेब्रुवारी) अर्ध्या दिवसाचा दुखवटा जाहीर केला. आचार्य विद्यासागर महाराज यांनी रविवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे सल्लेखना व्रतानंतर देह ठेवला.
अधिक माहिती
● 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी निर्यापकश्रमण योगसागर महाराज यांच्याशी चर्चा करून मुनिसंघ कार्यातून निवृत्ती घेत आचार्यपदाचा त्याग केला.
● गेले तीन दिवस अखंड मौन धारण करत त्यांनी आहार आणि संघाचा त्याग करत यम सल्लेखना धारण केली. रविवारी पहाटे त्यांना समाधिमरण प्राप्त झाले. दुपारी एक वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर चंद्रगिरी तीर्थावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
● कर्नाटकमधील सदलगा (जि. बेळगाव) येथे 10 ऑक्टोबर 1946 रोजी शरद पौर्णिमेच्या दिवशी विद्यासागर यांचा जन्म झाला.
● नववीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर 1966 मध्ये त्यांनी आचार्य, देशभूषण महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले.
● त्यांची कठोर तपश्चर्या पाहून आचार्य ज्ञानसागर महाराज यांनी 30 जून 1968 रोजी आचार्य विद्यासागरजींना मुनीदीक्षा दिली.
● ते 24 वर्षांचे असतानाच त्यांना गुरूंनी त्यांच्याकडे आचार्यपद सोपवले.
● आचार्य विद्यासागर यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करत सत्य अहिंसा आणि शिक्षणाचा प्रसार केला.
● विविध ठिकाणी भव्य दिव्य जैन तीर्थक्षेत्र उभारण्याबरोबरच गोशाळा, शैक्षणिक संस्था त्यांनी उभ्या केल्या.
● ‘मूकमाटी’ या त्यांनी लिहिलेल्या महाकाव्यास अनेक राष्ट्रीय व जागतिक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले.