जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांनी शतकापूर्वी जिथे विश्व भारतीची स्थापना केली त्या शांतीनिकेतन स्थळाला युनोस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील या स्थळाला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी यासाठी भारताकडून पाठपुरावा सुरू होता. सौदी अरेबियात सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुप्रसिद्ध पुरातत्त्व वास्तुविशारद आभा नारायण लांबा यांनी यासाठी दस्तावेज तयार केले होते. काही महिन्यांपूर्वी या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था आयकोमॉसने शांतिनिकेतनविषयी युनेस्कोला शिफारस केली होती. शांतिनिकेतन हे विद्यापीठाचे शहर कोलकात्यापासून 160 किलोमीटरवर आहे. रवींद्रनाथ टागोर यांचे पिता देवेंद्रनाथ यांनी तेथे सर्वप्रथम एका आश्रमाची स्थापना केली होती. त्या ठिकाणी ध्यानधारणेसाठी प्रवेश देताना कोणत्याही प्रकारचा जातीपंथ भेदभाव केला जात नसे.


