गोव्यामधील विविध सामाजिक संस्थांचे अध्वर्यू रामकृष्ण केशव नायक यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. मडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘धि गोवा हिंदू’ असोसिएशनसह अनेक संस्थांच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
अधिक माहिती
● व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असलेल्या नायक यांनी गोव्याबरोबर मुंबईतही सेवा दिली.
● नाट्य चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते.
● धि गोवा हिंदु असोसिएशनची स्थापना 1919 मध्ये झालीअसली तरी 60 च्या दशकात संस्थेच्या कला विभागाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.
● सुरुवातीला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत तीन-चार वर्षे गाजवल्यानंतर संस्थेने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले.
● ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तुझा तू वाढवी राजा’, ‘अखेरचा सवाल’, ‘संगीत मत्स्यगंधा’, ‘धन्य ती गायनी कळा’, ‘मीरा मधुरा’, ‘बॅरिस्टर’, ‘संध्याछाया’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘हयवदन’, ‘नागमंडल’, ‘नटसम्राट’, ‘बिऱ्हाड बाजलं’, ‘सभ्य गृहस्थ हो’, ‘स्पर्श’ अशी एकाहून एक सरस नाटकांची निर्मिती संस्थेने केली. यानिमित्ताने वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, वसंत कानेटकर, गिरीश कार्नाड, रत्नाकर मतकरी यांच्यासारखे नाटककार, विजया मेहता, दामू केंकरे, पं. जितेंद्र अभिषेकी, रामदास कामत, मोहनदास सुखटणकर, आशालता वाबगावकर अशी रंगकर्मी मंडळी संस्थेशी बांधली गेली. ‘स्थळ: स्नेहमंदिर’ हे अभिराम भडकमकर यांचे नाटक ही संस्थेची शेवटची निर्मिती ठरली.
● नायक यांना वडिलांकडून समाजकार्याचा वारसा मिळाला होता. त्याच्या जोरावर त्यांनी अनेक संस्थांची उभारणी केली.
● ‘स्नेहमंदिर’ या ज्येष्ठ नागरिक व विकलांगांसाठी स्थापन केलेल्या संस्थेत त्यांचा पुढाकार होता.
● याखेरीज गोवा हिंदूच्या शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता.
● मडगावचे गोमंत विद्या निकेतन, गोवा मराठी विज्ञान परिषद, समाजसेवा संघ अशा अनेक संस्थांच्या उभारणीत नायक यांचा मोलाचा सहभाग राहिला.